रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात लांजा शहरापासून १८ किमीवर साटवली गाव आहे. या गावातून मुचकुंदी नदी वाहाते. या नदी मार्गे चालणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी साटवलीच्या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. लांजा आणि राजापूरहून साटवलीला जाण्यासाठी एसटीच्या बसेस आहेत. लांज्याहून अर्ध्या दिवसात हा किल्ला पाहून होतो.

Satavali Fort, Satavali Fort Trek, Satavali Fort Trekking, Ratnagiri

गडावरील पहाण्याची ठिकाणे

साटवलीचा किल्ला टेहळणीचा किल्ला असल्याने त्याचा आकार फारच छोटा आहे. किल्ल्याची बांधणीही मोठ मोठे चिर्‍याचे दगड एकमेकांवर रचून तटबंदी बनवलेली असल्याने आज तटबंदी आणि बुरुज ढासळलेले आहेत. ढासळेल्या प्रवेशद्वाराच्या बाजूला दोन बुरुज कसेबसे उभे आहेत. प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर एक प्रचंड मोठा वृक्ष आपले स्वागत करतो. या वृक्षाच्या उजव्या बाजूला एक आयताकृती विहीर आहे. विहिर पाहून वृक्षाच्या मागच्या बाजूला जाताना एक कोरीव दगडाचा तुकडा पडलेला दिसतो. एखाद्या मंदिराच्या दगडी खांबा सारखा हा तुकडा दिसतो. पुढे गेल्यावर उध्वस्त वास्तूचे चौथरे आहेत. किल्ल्याला एकूण पाच बुरुज असून सर्वांची अवस्था दयनीय झाली आहे. किल्ल्यात झाडी वाढल्याने या बुरुजांपर्यंत पोहोचता येत नाही.

किल्ला पाहून परत बाहेर आल्यावर समोर मुचकुंदी नदीचे पात्र दिसते. पण पात्राच्या बाजूला कोणतेही बांधकाम दिसत नाही. साटवली गावातून किल्ल्याकडे येतांना एका चौथऱ्यावर वीरगळ, सतीगळ आणि काही मुर्ती ठेवलेल्या पाहायला मिळतात. गावातील विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ एक तोफ आहे. साटवलीचा किल्ला पाहाण्यासाठी १५ मिनिटे पुरतात.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

साटवलीला जाण्यासाठी राजापूर आणि लांजा या दोन्ही ठिकाणाहून एसटी बसेस सुटतात. साटवली लांजा अंतर १८ किलोमीटर आहे. तसेच लांज्याहून साटवली करिता दिवसभरात ७ बसेस आहेत. त्यामुळे लांजाहून साटवलीला जाणे सोपे पडते. मुंबई - गोवा महामार्गावर लांजा हे मोठे शहर आहे. लांजा शहरातून साटवली मार्गे नाटे (यशवंतगड) आणि आंबोळगडला जाणारा रस्ता आहे. एसटीने गेल्यास साटवली शाळे समोरच्या गावात जाणाऱ्या रस्त्याने ५ मिनिटात किल्ल्याच्या प्रवेशव्दारापाशी पोहोचता येते.

खाजगी वाहानाने थेट किल्ल्याच्या प्रवेशव्दारापाशी जाता येते. खाजगी वहानाने एका दिवसात साटवली. यशवंतगड (नाटे), आंबोळगड, पूर्णगड हे किल्ले पाहून रत्नागिरीत मुक्कामाला जाता येते.

राहाण्याची सोय

किल्ल्यात आणि गावात राहाण्याची सोय नाही.

जेवणाची सोय

गावात जेवणची सोय नाही. लांजा आणि नाटे येथे जेवणसाठी हॉटेल्स आहेत.

पाण्याची सोय

किल्ल्यात पिण्याचे पाणी नाही.