प्राचिनकाळी मालवण बंदर, आचरा बंदर या ठिकाणी उतरणारा माल अनेक मार्गांनी घाटावरील बाजारपेठात जात असे. या मार्गांचे रक्षण करण्यासाठी त्याकाळी मोक्याच्या जागी किल्ले बांधण्यात आले. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सिध्दगड हा किल्ला मालवण, आचरा बंदरहून घाटमाथ्यावरील आजरा या बाजारपेठेकडे जाणार्‍या मार्गावरील घोटगीच्या घाटावर व कसाल नदीवर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता.

Siddhagad-Malvan Fort, Siddhagad-Malvan Fort Trek, Siddhagad-Malvan Fort Trekking, Sindhudurg

इतिहास

सिध्दगड सावंतांनी बांधला. एप्रिल-मे १८१८ मध्ये इंग्रज कर्नल इम्लाक याने किल्ल्यावर हल्ला करुन घेण्याचा प्रयत्न केला. पण किल्ल्यावरुन झालेल्या कडव्या प्रतिकारानंतर त्याला माघार घ्यावी लागली. मग त्याने ८० रेजिमेंटची तुकडी मालवणहून मागवून किल्ल्यावर परत हल्ला केला व किल्ला जिंकून घेतला.

गडावरील पहाण्याची ठिकाणे

सिध्दगड २५ एकरावर पसरलेला असून किल्ल्याच्या कुठल्याही खुणा आजमितीस गडावर नाहीत. गडावर प्रवेश केल्यावर आपल्याला लांबवर पसरलेल्या जांभ्या दगडाचे पठार दिसते. मालवणी भाषेत याला काप किंवा सडा म्हणतात. या सड्यावर वस्ती आहे, त्याला सिध्दगडवाडी म्हणतात. सड्याच्या टोकावरुन आजुबाजूचा विस्तृत प्रदेश व कसाल नदी दृष्टीक्षेपात येते. सप्टेंबर महीन्यात आल्यास माळरानावरील वेगवेगळ्या प्रकारची फुले फुललेली पाहायला मिळतात.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

ओवळीचे हे सिध्दगडच्या पायथ्याचे गाव आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवण व कणकवली या दोनही शहरातून येथे जाता येते.

१) मालवण - आचरा मसदे - ओवळीये - सिध्दगड (३५ किमी) किंवा मालवण (३३ किमी) - कसाल - (३ किमी) ओवळीये.

२) कणकवलीहून मुंबई - गोवा महामार्गाने कुडाळकडे जाताना कसाल गावाच्या (१ किमी) अगोदर ओवळीचे फाटा उजव्याबाजूस आहे. तेथून ओवळीये २ किमी वर आहे.

३) मालवण - कसाल किंवा कणकवली - कसाल बससेवा आहे. कसालहून ओवळीयेला जाण्यासाठी ठराविक वेळेतच बसेस आहेत. म्हणून कसालहून जाण्या येण्याकरीता रिक्षा ठरवून गडावर जावे.

ओवळीये गावातून रामेश्वर मंदिराच्या पुढे एक कच्चा रस्ता सिध्दगडवाडीकडे जातो. २००९ साली या रस्त्याने पाऊण डोंगर वाहन घेऊन जाता येते. पुढे १० मिनीटे चढल्यावर आपण सिध्दगडच्या पठारावर पोहोचतो.

राहाण्याची सोय

ओवळीये गावातील शाळेच्या ओसरीवर १० जणांची रहायची सोय होऊ शकते.

जेवणाची सोय

गडावर जेवणाची सोय नाही, ३ किमी वरील कसाल गावात होऊ शकेल.

पाण्याची सोय

गडावर पाण्याची सोय आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ

ओवळीये गावातून चालत ३० मिनीटे लागतात, तर वाहनाने १० मिनीटे लागतात.

सूचना: मालवणहून सकाळी निघून (१२ किमी) मसूरे जवळील भरतगड व भगवंतगड पाहून (१७ किमी) रामगडला जाता येते. तसेच रामगडहून ओवळीये गावातील (१० किमी) सिध्दगड पाहून कसाल मार्गे (३६ किमी) मालवणला येता येते. या मार्गाने हे ४ किल्ले एका दिवसात पाहून होतात.