महाराष्ट्रात सोनगिरी नावाचे अनेक किल्ले आहेत. एक रायगड जिल्ह्यात नागोठाणे जवळचा सोनगिरी तर दुसरा धुळ्या जवळचा सोनगिरी आणि पुणे जिल्ह्यातील कर्जत जवळचा सोनगिरी. गडकिल्ल्यांचा अभ्यास करतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे त्यांचे स्थान. गडकिल्ले साधारणत: घाटाच्या पायथ्याशी, घाटाच्या माथ्यावर बांधलेले आढळतात. पुणे जिल्ह्यातील हा सोनगिरीचा किल्ला सुध्दा ऐन बोरघाटाच्या पायथ्याशीच आहे. या किल्ल्याला ‘आवळसचा किल्ला’ असे ही म्हणतात.

Songiri Fort, Songiri Fort Trek, Songiri Fort Trekking, Raigad

जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे

गडावर जातांना थोडीशी तटबंदी लागते. गडमाथा फारच चिंचोळा आहे. त्यावर पाण्याच्या दोन टाक्यां व वाड्यांचे चौथरे आहेत. गडावरुन बोरघाटाचे सुंदर दृश्य दिसते. समोरच राजमाची, ढाकगड, भिवगड, प्रबळगड असे सर्व किल्ले लक्ष वेधून घेत असतात.

कसे जावे

रेल्वे

पळसदरी मार्गे: पळसदरी हे खंडाळा घाटाच्या पायथ्याचे रेल्वे स्थानक. रेल्वे स्थानकाच्या बाहेरच एक छोटेसे धरण आहे. मुंबईहून रेल्वेने कर्जतच्या पुढे ३ किमी अंतरावर असणार्‍या पळसदरी रेल्वे स्थानकावर उतरायचे. पळसदरी रेल्वे स्थानकावरुन समोरच सोनगिरीचा किल्ला दिसतो. पळसदरी मधून १५ मिनिटाच्या अंतरावर ‘आवळस ’ गावात पोहोचायचे. आवळसपासून पुढे १५ मिनिटाच्या अंतरावर असणार्‍या ‘नावली’ गावात पोहोचायचे. हेच किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गावातूनच किल्ल्यावर जाण्यासाठी ठळक वाट आहे. गावातून किल्ल्यावर जातांना दोन टेकाडं ओलांडावी लागतात. साधारणत: एक ते सव्वा तासात आपण किल्ल्याच्या कातळकड्यापाशी पोहोचतो. कातळकड्याच्या पायथ्यापासून डावीकडची वाट धरायची आणि कातळकडा उजवीकडे ठेवून एका घळीतून वर चढायचे. किल्ला आणि त्याच्या बाजूला असणार्‍या डोंगराच्या बेचक्यात आपण पोहोचतो. घळीतून वर जाणारी वाट निसरडी असल्याने जरा जपूनच चढावे लागते. बेचक्यातून उजवीकडे वर जाणारी वाट धरायची आणि ५ मिनिटात गडमाथा गाठायचा.

जामरूंग मार्गे: कर्जत - खोपोली रेल्वेमार्गावर पळसदरीच्या पुढे जामरूंग स्टेशन आहे. येथे उतरून मुंबईच्या दिशेला चालत येतांना वाटेत रेल्वेचा बोगदा लागतो. या बोगद्याच्यावर जाणारी वाट पकडून वर गेल्यावर किल्ल्याच्या डोंगराची एक धार खाली उतरलेली दिसते. या धारेवरून किल्ल्यावर जाता येते. पुढे या वाटेला पळसदरी मार्गे येणारी वाट मिळते.

राहण्याची सोय

गडावर राहण्याची सोय नाही.

जेवणाची सोय

गडावर जेवणाची सोय नाही.

पाण्याची सोय

गडावर पिण्याचे पाणी नाही.