किल्ल्याची नावावरून आपल्या सर्वांना असेच वाटेल की, किल्ला चढायला खरोखरच कठीण आहे मात्र किल्ला चढण्यास फारच सोपा आहे. पवन मावळ प्रांतातीळ तुंग किला हा एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. पूर्वी बोरघाटामार्गे चालणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. या किल्ल्यावरून लोहगड, विसापूर, पवन मावळ हा सर्व परिसर नजरेत येतो.

Tung Fort, Tung Fort Trek, Tung Fort Trekking, Pune

इतिहास

या किल्ल्याला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली नाही. मात्र १६५७ मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला. सन १६६० मध्ये या भागाच्य सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. जयसिंगाने आणि दिलेरखानाने आपल्या स्वारीच्या वेळी ६ मे १६६५ रोजी तुंग आणि तिकोना या भागातील अनेक गावे जाळली. पण,हे किल्ले मात्र जिंकू शकले नाही. १२ जून १६६५ पुरंदर तहानुसार १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

गडमाथा फारच आटोपता असल्यामुळे एक तासात सर्व गड पाहून होतो. तुंगवाडीतून गडावर जाणारी वाट मारुतीच्या मंदिरा जवळून जाते. या मंदिरात ५ ते ६ जणांची राहण्याची सोय होते. या मंदिरापासून थोड्याच अंतरावर गडावर जाण्यासाठी पायऱ्या लागतात. पायऱ्यांच्या वाटेत अंतरावर हनुमान मंदिर लागते. पुढे गोमुखी रचनेचा दरवाजा आहे. येथून आतं शिरल्यावर आपण गड माथ्यावर पोहोचतो. उजवीकडे गणेशाचे मंदिर आहे. मंदिराच्या मागील बाजूस पाण्याचा खंदक आढळतो. येथूनच बालेकिल्ल्यावर जाणारी वाट आहे. बालेकिल्ल्यावर तुंगीदेवीचे मंदिर आहे. मंदिरा समोरच जमिनीत खोदलेली गुहा आहे. यात पावसाळ्या शिवाय इतर ऋतुत २ ते ३ जणांची राहण्याची सोय होऊ शकते. अशा प्रकार एक दिवसात किल्ला पाहून लोणावळ्याला परतता येते.

गडावर जाण्याच्या वाटा

या गडावर जाणाऱ्या सर्व वाटा पायथ्याच्या तुंगवाडीतूनच जातात. या वाडीतून गडावर जाण्यास साधारणतः ४५ मिनिटे लागतात. गडमाथा तसा लहान असल्यामुळे एक तासात सर्व गड पाहून होतो.

घुसलखांब फाट्यामार्गे: गडावर जाण्यासाठी लोणावळा स्टेशनवर पोहचावे. येथून भांबूर्डे अथवा आंबवणे कडे जाणारी एस.टी पकडून २६ कि.मी. अंतरावरील घुसलखांब फाट्यापाशी उतरावे. या फाट्यापासून दीड तासांची पायपीट केल्यावर आपण ८ कि.मी. अंतरवरील तुंगवाडीत पोहोचतो.येथून गडावर पोहचण्यास ४५ मिनिटे लागतात.

ब्राम्हणोली-केवरे: अनेकजण तिकोना ते तुंग असा ट्रेक देखील करतात. यासाठी तिकोना किल्ला पाहून तिकोनापेठेत उतरावे आणि काळे कॉलनीचा रस्ता धरावा. वाटेतच ब्राम्हणोली गावं लागते. यागावातून लॉंच पकडून पवनेच्या जलाशयात जलविहाराची मौज लुटत पलीकडाच्या तीरावरील केवरे या गावी यावे. केवरे गावापासून २० मिनिटातच आपण तुंगवाडीत पोहोचतो.

तुंगवाडीच्या फाट्या मार्गे: जर लॉंच ची सोय उपलब्ध नसेल तर तिकोनापेठेतून दुपारी ११.०० वाजताची एस.टी. महामंडाळाची कामशेत-मोरवे गाडी पकडून मोरवे गावाच्या अलीकडच्या तुंगवाडीत फाट्यावर उतरावे. येथून पाऊण तासांची पायपीट केल्यावर आपण तुंगवाडीत पोहचतो.

तुंगवाडीतील मारुतीच्या मंदिरात ६ ते ७ जणांची राहण्याची सोय होते. तुंगवाडीत भैरोबाचे देखील मंदिर आहे यात २० जणांना राहता येते. जेवणाची सोय आपण स्वतः करावी. मंदिरा जवळच गावात पाणी उपलब्ध आहे. गडावर जाण्यासाठी पायथ्यापासून ४५ मिनिटे लागतात.