वसंतगड सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील इतिहासप्रसिद्ध किल्ला आहे. तळबीड गाव हे वसंतगड या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. हा किल्ला पुणे-बंगळुरु हा राष्ट्रीय महामार्गावरील उंब्रज आणि कराड यांच्या मध्ये रस्त्याच्या पश्चिमेकडे आहे. या महामार्गावर तळबीड फाट्याला उतरुन ३ कि. मी. पश्चिमेकडे असलेल्या तळबीडला जावे लागते. कराडवरुन एसटी बसेस ची सोय आहे. वसंतगड हा तळबीड परिसराचे रक्षण करणारा किल्ला होता, मराठा साम्राज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि त्यांची कन्या रणरागिणी महाराणी ताराबाई या तळबीड गावचे होते.

Vasantgad Fort, Vasantgad Fort Trek, Vasantgad Fort Trekking, Satara

इतिहास

वसंतगडाची निर्मिती भोज शिलाहार राजाने केली. इ.स. १६५९ मध्ये शिवरायांनी वसंतगड स्वराज्यात सामील करून घेतला. मसूरचे पूर्वापार जहागीरदार असलेले महादजी जगदाळे यांचा वसंतगड हा बालेकिल्ला होता. मसूरच्या जगदाळ्यांनी आदिलशाहीची परंपरेनं चाकरी केली. अर्थात महाराजांना विरोध करणं त्यांना भागच पडलं. महादाजी जगदाळे हे तर शाही नोकर म्हणून अफझलखानाच्या सांगाती प्रतापगडच्या आखाड्यात उतरले. त्यात खान संपला. शाही फौजेची दाणादाण उडाली. त्यात महादजी जगदाळे तळबीड गावाजवळ महाराजांचे हाती जिता गवसला. महाराजांनी त्याचे हात तोडले आणि वसंतगड स्वराज्यात घेतला. याच महादाजीला आठदहा वर्षाचा पोरगा होता. जिजाऊसाहेबांनी अगदी आजीच्या मायेनं या पोराला आपल्यापाशी सांभाळला. त्याला शहाणा केला. तो स्वराज्याचाच झाला. पुढे जिंजीहून परत आल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज काही दिवस वसंतगडावर मुक्कामास होते.इ.स. १७०० साली औरंगजेबाने हा किल्ला जिंकला. व त्याचे नाव ‘किली-द-फतेह’ असे ठेवले. पण इ.स. १७०८ साली मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकला.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

गडाचे मुख्य प्रवेशद्वार इंग्रजांनी तोफांच्या भडिमाराने भग्न केले आहे. आत जाताच डाव्या हातास एका घुमटीत गणेशाची सुंदर मूर्ती आहे. येथून सरळ जाणाऱ्या पायवाटेने गेल्यानंतर आपण गडाच्या मध्यभागी असलेल्या श्री चंद्रसेन महाराजांच्या मंदिराशेजारी येऊन पोहोचतो. मंदिर सुरेख असून आत गाभार्यात चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे. चैत्रातल्या दुसर्या पंधरवड्यात वसंतगडावर मोठी जत्रा भरते. मंदिराच्या पलीकडेच जुन्या राजवाड्याचे अवशेष दिसतात. मंदिर परिसर पाहून डाव्या बाजून मंदिराच्या बाहेरील वाटेने पुढे गेल्यास वाटेत आपणास चुन्याच्या घाणीचे अवशेष दिसतात. पुढे कोयनातळे व कृष्णातळे अशी दोन तळि आहेत. त्यांच्या काठावर जुन्या समाध्या व सतीशिळा आहेत. गडाच्या चारी बाजूंनी चार डौलदार बुरूज असून त्यावर चढण्यासाठी दगडी जिनेही आहेत. गडाच्या पश्चिम भागात गोमुखी बांधणीचा दरवाजा असून ह्या दरवाज्याचे व त्याच्या तटबंदीचे बांधकाम आजही चांगल्या अवस्थेत आहे.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

वसंतगडाचे पायथ्याचे गाव म्हणजे इतिहास गाजवणार्‍य़ा सरसेनापती हंबींरराव मोहीते आणि महाराणी ताराबाई यांचे ‘तळबीड’ गाव. कराडवरुन अर्ध्या तासाच्या अंतरावर तळबीड गाव आहे. कराड - सातारा रस्त्यावर कराड पासून ८ किमीवर तळबीडला जाणारा फाटा आहे. एसटी स्थानकावरुन तळबीडला जाण्यास दर अर्ध्या तासाला एसटी आहे. गावातच हंबीररावांचे स्मारक आहे. गाव संपल्यावर वसंतगडला जाण्याची चढण सुरु होते. वाट मळलेली आहे. पुढे वाट गडाला उजव्या हाताला ठेवत एका झाडाजवळ येते. तेथून सहजपणे गडमाथा गाठता येतो. गावातून किल्ल्यावर जाण्यास ४५ मिनीटे लागतात.

याशिवाय कराड - चिपळूण रस्त्यावर , कराड पासून ९ किमी अंतरावर वसंतगड गावात जाणारा रस्ता आहे. गाव संपल्यावर वसंतगडला जाण्यासाठी मळलेली वाट आहे.

राहाण्याची सोय

चंद्रसेनच्या मंदिरात १० ते १२ जणांची राहण्याची सोय होते.

जेवणाची सोय

गडावर जेवणाची सोय नाही, कराडमध्ये आहे.

पाण्याची सोय

गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ

१) तळबीड मार्गे १ तास लागतो.
२) वसंतगड गावामार्गे १ तास लागतो.

सूचना:
समर्थ रामदासांच्या ८ घळींपैकी चंद्रगिरी घळ वसंतगडापासून दिड ते दोन तासांच्या अंतरावर आहे. वसंतगडावरील पश्चिमेच्या प्रवेशव्दारातून बाहेर पडून खिंडीत उतरावे.तिथून चरेगाव बेचदेर गावातून चंद्रगिरी घळ गाठावी. परत येतांना वसंतगडा पर्यंत न येता चरेगावात उतरावे. तिथून कराडला येण्यासाठी वडाप व बसची चांगली सोय आहे.